प्रभात वृत्तसेवा आळंदी – जुन्नर वनविभागांतर्गत येणार्या चाकण परिसरात सध्या मानव-बिबट संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे बनावट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, खोटी माहिती पसरवणार्यांविरुद्ध आता थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा चाकण वनपरिक्षेत्र कार्यालयाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्ती एआय सॉफ्टवेअर आणि विविध प्लिकेशन्सच्या मदतीने बिबट्याचे फोटो एडिट करत आहेत. हे बनावट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट पसरत असून प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत आहे. या प्रकाराची वनविभागाने गंभीर दखल घेतली आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपरिचित किंवा संशयास्पद फोटो-व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. बिबट्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास ती वनविभागाकडे त्वरित कळवावी, मात्र खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये. अफवा पसरवणार्यांवर सायबर पोलीस आणि वनविभागाची करडी नजर असल्याचेही यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 3 वर्षांचा कारावास आणि 1 लाखाचा दंड वनरक्षक अचल गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याविषयी अफवा पसरवणे, लोकांमध्ये भीती निर्माण करणे किंवा खोटी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. अशा कृत्यांसाठी भारतीय न्यायसंहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीस 3 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.