प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन प्रभागातील दोन जागांची निवडणूक वगळून नगराध्यक्ष व इतर नगरसेवक पदाच्या जागांची निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 13 ब आणि प्रभाग क्रमांक 17 अ या दोन जागांची निवडणूक निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर होणार आहे.बारामती नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला. यामध्ये बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील तेराव्या प्रभागातील ब क्रमांकाची जागा व सतराव्या प्रभागातील अन क्रमांकाची जागा या जागेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर व उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर (दि.26) नव्याने प्रत्येकी एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यासाठी सत्र न्यायालयाने निकाल दिला होता.न्यायालयाच्या आदेशानुसार हे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र, तांत्रिक बाबी लक्षात घेता या उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडन सुधारित आदेश मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या नव्याने येणाऱ्या आदेशानुसार दोन जागांची निवडणूक होईल. तोपर्यंत या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर बाकीच्या सर्व जागांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. भाजपाचे नेते सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांचे अर्ज सुरुवातीला नामंजूर करण्यात आले होते. त्यांनी या संदर्भात सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नगरपरिषद राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरील नामनिर्देशन पत्र सादर करतानाचा सीसीटीव्ही फुटेज त्यांनी सादर केला होता. न्यायालयाने सर्व बाजू पडताळून नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांचे अर्ज स्वीकारावेत अशा प्रकारचा आदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी नव्याने (दि.२६) उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. अधिकारी, सत्ताधाऱ्यांना दणका बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अधिकारी यांच्या मनमानीला न्यायालयाने चाप लावला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांना हा दणका बसला असल्याची चर्चा शहरातून सुरू आहे. प्रभाग क्रमांक 13 ब आणि प्रभाग क्रमांक 17 अ या दोन जागांची निवडणूक निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर होणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह आहे. तसेच या निवडणूक होणाऱ्या दोन जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.