प्रभात वृत्तसेवा भोर – संगमनेर (ता. भोर) ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सायली महेंद्र साळुंखे यांना कर्तव्य पालनात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल पूण्याचे विभागीय आयुक्तांनी पदावरून व सदस्य पदासाठी उर्वरित कालावधीसाठी हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे सरपंच सायली साळुंखे यांना दिलासा मिळाला आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३९ (१) अंतर्गत कारवाई करत साळुंखे यांना सरपंच पदावरून दूर करण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध साळुंखे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३९ (३) नुसार ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे १५ डिसेंबरला अपील दाखल केले. या प्रकरणावर ६ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी अपिलार्थी सायली साळुंखे आणि प्रतिवादींचे वकील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी या प्रकरणात अपिलार्थी आणि प्रतिवादी यांचे मुद्दे तपासणे आवश्यकआहे. त्यामुळे सद्यस्थितीत अंतिम निर्णय घेता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. वस्तुस्थिती विचारात घेता, विभागीय आयुक्तांच्या ८ डिसेंबर २०२५ च्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी ८ जानेवारीच्या काढलेल्या आदेशात म्हटले आहे.