प्रभात वृत्तसेवा भोर – पिसावरे (ता.भोर) येथील डोंगराच्या शेजारील परिसरात अज्ञात व्यक्तींनी वणवा लावला. दरम्यान या वणव्यामुळे झाडे, झुडपे व गवत जळून खाक झाले. याचा थेट परिणाम परिसरातील वन्यजीवांवर होणार असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करीत काही ग्रामस्थ एकत्र येत झाडांच्या फांद्या तोडून, माती व पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. वणवा आटोक्यात आणण्यासाठी कल्पना बरदाडे, संगीता बरदाडे, राजश्री बरदाडे, शारदा बरदाडे, चंद्रभागा बरदाडे, शितल बरदाडे, लक्ष्मी आंबवले, जिजाबाई बरदाडे, सोपान बरदाडे, अंकुश बरदाडे, लक्ष्मण बरदाडे, बाळु आंबवले व दत्तात्रय चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वणवा विझवल्यानंतर ग्रामस्थांनी वणवा लावणाऱ्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. वणवा लावणे हा गंभीर गुन्हा असून त्यावर मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखा कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.