प्रभात वृत्तसेवा महुडे – भोर शहराजवळील नीरा नदीपात्रात रविवारी (दि. ४) एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सुनीता गणपत भंडारे (वय ५५ रा. शिंद, ता. भोर) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत उमेश रघुनाथ मोरे (रा. भोलावडे, ता. भोर) यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला भोलावडे येथे मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. मध्यरात्री (दि. ३) संबंधित महिला घरातून निघून गेली. त्यानंतर महिला हरविल्याची तक्रार भोर पोलिसांत देण्यात आली. तपास सुरू असतानाच, रविवारी (दि. ४) भोलावडे गावच्या जवळ नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.