प्रभात वृत्तसेवा भोर – भोर शहरात नगरपरिषद निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असून भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गटात सरळ लढत होत आहे. नगरसेवक पदासाठी २० जागेसाठी भाजपाचे २० उमेदवार तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे २० उमेदवार उभे राहिले असून ९ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवले आहेत. यामध्ये शिवसेनेचे २, काँग्रेस १ जागेवर लढत असून भाजपा व राष्ट्रवादीत प्रत्येकी २ ठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरी केल्यामुळे दोन्हीही पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.भोर शहरात १० प्रभागांमध्ये १६७१६ मतदार आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आरोप प्रत्यारोप करण्यात आले. सोशल मीडियाद्वारे एकमेकांविरोधात टीकेच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. यानंतर भोर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत असून प्रभाग क्रमांक २ व ७ या ठिकाणी शिवसेनेने २ उमेदवार उभे केले आहेत तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसने एकमेव उमेदवार उभा केलेला आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक उमेश देशमुख यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादीचे उमेश धारणे व प्रभाग क्रमांक सहामध्ये मयूर भिसे तर प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाचे मदन घोणे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवकांना ११ ठिकाणी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली असून नऊ नऊ ठिकाणी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आलेले आहे अनेकांचे अचानक तिकीट कट होणे, मुस्लिम उमेदवार न दिल्याने जातीय समीकरण न बसल्याने थोड्याफार प्रमाणात नाराजी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने पक्षात प्रवेश केलेला उमेदवारी मिळाली नाही बंडखोरीमुळे नाराजी जाणवत आहे. अनेक ठिकाणी त्यांना प्रबळ उमेदवार देता आले नाहीत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संजय जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे यांच्यात तुल्यबळ लढत दिसत असली तरी नगरसेवकांच्या निवडणुकीत थोड्याफार प्रमाणात भाजपाचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.मागील सतरा वर्षापासून आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता असून शहरातील मतदारांची आणि शहराची संपूर्ण माहिती आहे बाजी कोण मारणार, याबाबत उत्सूकता तर आमदार मांडेकर हे शहरात नवखे असून प्रथमच निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आलेले आहेत.या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार संग्राम थोपटे यांना सत्ता कायम राखण्यासाठी आणि आमदार शंकर मांडेकर यांना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यामुळे दोन्ही आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.