प्रभात वृत्तसेवा भिगवण – वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली. भिगवण ते शेटफळगढे या रस्त्यावरील ट्रॅक्टर वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भिगवण पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मदनवाडी येथील घाटात बारा ते तेरा ट्रॅक्टरवर कारवाई केली. ऊस वाहतूक सुरू झाल्यापासून सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूकदारांना वेळोवेळी सूचना करून देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे महांगडे यांनी सांगितले. ऊस वाहतूकदारांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई यापुढेही कोणत्याही दबावाला बळी न पडता चालू ठेवण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, महेश उगले, गणेश करचे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, साबळे, महिला पोलीस हवालदार भोंग, पोलीस कॉन्स्टेबल पवार, आप्पा भांडवलकर आदी कर्मचारी सहभागी होते. या गोष्टींची होणार तपासणी चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे, वाहनाचा विमा, परवाना, आधारकार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, तसेच वाहन बिघाड झाल्यास मार्गाच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावणे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास 112 नंबरवर संपर्क साधावा. वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद असणे आवश्यक आहे. अशा महत्वपूर्ण सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.