Baramati News – (स्व) अजित पवार यांच्या शोकसभेसाठी पुन्हा बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आले. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. अनेक वर्षानंतर शरद पवार हे सहयोग निवासस्थानी गेले होते. यावेळी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदावर अजित पवार यांच्यानंतर पार्थ की जय पवार यांपैकी कोणाला संधी द्यायची, याबाबत चर्चा झाली आहे.दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी राज्यभरातून लोकांची सहयोग सोसायटी येथे रांग लागली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये संस्थेची बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, संस्थेचे विश्वस्त व अजित पवार यांची बहीण विजया पवार याही उपस्थित होत्या. ही बैठक कौटुंबिक असल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, यावेळी शरद पवार यांची पार्थ आणि जय पवारांसह एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह घेतलेल्या बैठकीत जरी संस्थेविषयी चर्चा झाली असली तरी नंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही पुत्रांमध्ये राजकीय चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनंतर जय पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारस्थळाचे दर्शन घेऊन पाहणी केली. यावेळीअजित पवार यांचे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या आराखड्याची जय पवार यांनी पाहणी केली.