प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील संतोष कुंभार यांच्या येथील सीसीटीव्हीमध्ये (दि.२३) पहाटे अंदाजे १.४५ वाजता बिबट्या स्पष्ट दिसून आला आहे. वडाच्या झाडाजवळ फिरताना त्याच्या हालचाली कॅमेऱ्यांत कैद झाल्या.गेल्या काही दिवसांत पशुधनावर हल्ल्यांची मालिका गावात बिबट्याची हालचाल वाढल्याचे संकेत याआधीच मिळाले होते. मागील काही दिवसांत दोन ते तीन शेळ्या आणि एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली होती. (दि.२३) रात्री गाडे-धायगुडे वस्तीवर बाळासाहेब कृष्णा गाडे यांच्या एका शेळीला देखील बिबट्याने ठार केले आहे. या सलग हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे देखील नागरिकांना कठीण झाले आहे. प्रशासन आणि नागरिकांना आवाहन स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली असून पुढील कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना खालील बाबींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आवश्यक असल्याशिवाय रात्री बाहेर जाणे टाळावे. शेळ्या, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे. निरावागज परिसरात वाढत्या बिबट्या हालचालीमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.