प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – खोटी कागदपत्रे तयार करून लेटरहेड, शिक्के, जीएसटी क्रमांक, ई-मेल आयडी आदींचा गैरवापर करत भागीदारांमध्ये असलेली सुमारे दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही सहा महिने उलटून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप उद्योजक अविनाश अर्जुन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपी चंद्रकला सुरेश किनिंगे व सुरेश आण्णासो किनिंगे यांच्याविरुद्ध दि. 22 जून 2025 रोजी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 316(2), 318(4), 338(3), 340(1), 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याने सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी बारामती येथील समर्थ एंटरप्राइजेस, प्लॉट क्र. एफ-33 येथे नोंदणीकृत भागीदारी असताना आरोपींनी फिर्यादी अविनाश सावंत यांची संमती असल्याचे भासवून बोगस लेटरहेड तयार केला. त्या आधारे महावितरणमधील विद्युत कनेक्शन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतले. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संयुक्त खाते असताना स्वतःला एकमेव प्रोप्रायटर दाखवून सर्व आर्थिक व्यवहार एचडीएफसी बँक, गाळींदे नगर, भिगवण रोड, बारामती शाखेत वळवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.आरोपींनी वेगळा पॅन, जीएसटी क्रमांक दाखवून भागीदारीतील मालमत्तेचा रहिवासी पुरावा सादर केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी आर्थिक ताळेबंदाची मागणी करूनही आरोपींनी तो न दिल्याने सावंत यांनी कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र त्यालाही प्रतिसाद न देता परस्पर सी व ओ-2 प्लॅन उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही दि. 26 जून 2025 रोजी आरोपींनी संगनमताने बापू ज्योतिबा सोनवणे (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांना पाच महिन्यांचे कुलमुखत्यारपत्र दिले. हे कुलमुखत्यारपत्र बेकायदेशीर व दबाव आणण्याच्या उद्देशाने दिल्याचे लक्षात येताच सावंत यांनी बारामती न्यायालयात धाव घेतली. यावर अॅड. सतीश दळवी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून दि. 31 जुलै 2025 रोजी न्यायालयाने अंतरिम आदेश दिला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन उपोषण करण्याचा इशारा अविनाश सावंत यांनी दिला आहे.