Baramati Election – बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता (दि.७) फेब्रुवारी रोजी मतदान तर जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे (दि.९) फेब्रवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषद ३१ पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. मतदान, मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत १२ पंचायत समिती गणांकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची दि.१६ जानेवारी रोजी सूचना प्रसिद्ध केली. उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र १६ ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये स्वीकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी करुन २२ जानेवारी रोजी निर्णय देण्यात आले. २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्यात आली. जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार तसेच सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. २ लाख ६४ हजार मतदार हक्क बजावणार निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने २५ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकूण ६ भरारी पथकामध्ये १८ आणि ८ स्थिर निरीक्षण पथकामध्ये २४ तसेच १२ व्हिडीओ निरीक्षण पथकामध्ये ३६ तसेच २ व्हिडीओ व्हिंविंग पथकामध्ये ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणूक संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण १ हजार ९४५ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षकगण नियुक्त केले आहेत. निवडणूक घोषित झालेल्या क्षेत्राची लोकसंख्या ३ लाख १६४ असून त्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२ इतकी आहे. तालुक्यात एकूण २९९ केंद्र बारामती तालुक्यात २९९ केंद्र आहेत. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे महिला मतदान केंद्र तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटफळ येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोर्लेवाडी, गंगुबाई काटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथे ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीकरिता कंट्रोल युनिट (सीयू) २९९, बॅलेट युनिट (बीयू) ३४५ याव्यतिरिक्त सीयू ६० आणि बीयू १२० राखीव ठेवण्यात येणार आहे. टपाली मतदानाकरिता ७४३ अर्ज प्राप्त झाले असून आज अखेर ३१३ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. मतदार केंद्रावर सुविधा प्रत्येक केंद्रावर स्वच्छतागृह, पाळणा, व्हीलचेअर, रॅम्प, वैद्यकीय सुविधा, पोलीस संरक्षण, अग्निशामक, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित तसेच प्रसारमाध्यमातून मतदान करण्याबाबत प्रसिध्दी देण्यात आली आहे. विजयी उमेदवारांची नावे १० फेब्रुवारी रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी केले आहे.