राजगुरूनगर : राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून अश्विनी उद्धव कुंभार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीतील कार्यकाळात संवेदनशील, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा ठसा उमटविल्याने भाजपने त्यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील अनेक प्रश्न सोडवण्याचा अनुभव, स्वच्छ प्रतिमा आणि जनसंपर्कामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अश्विनी कुंभार यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाणी, कचरा, सांडपाणी, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत समस्यांवर प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना प्रभाग ८ मधून (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) उमेदवारी दिली. त्यांच्या पतीचे मार्गदर्शन, कुटुंबाची जनसेवेची परंपरा आणि समाजकार्याचा वारसा यामुळे त्या शहरातील जनतेत लोकप्रिय आहेत. शहरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून यापुढेही विकास कामांना गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः हुतात्मा राजगुरू स्मारक आणि केदारेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यावर त्यांचा भर आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहतूक, वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट व्यवस्था, पार्किंग, आरोग्य सुविधा अशा नागरिकांच्या दैनंदिन गरजांमधील अनेक प्रश्न सोडवण्याचे त्यांचे नियोजन तयार आहे. अश्विनी कुंभार यांची मतदात्यांशी बांधिलकी “सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी मी उमेदवारी स्वीकारली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून शहराच्या प्रगतीसाठी अनेक कामे केली. माझ्या प्रभागातील आणि संपूर्ण राजगुरुनगर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जनतेच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी आणखी वेगाने काम करणार आहे.” प्रमुख कामे आणि विकासाचे आश्वासन अश्विनी कुंभार यांनी प्रभाग ८ साठी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे : स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुसूत्र कचरा व्यवस्थापन आणि चौकांमध्ये कचरा संकलन केंद्र सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा वीजपुरवठा आणि योग्य ठिकाणी स्ट्रीटलाईट व्यवस्था शहरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्मिती लहान मुलांसाठी खेळाचे मैदान व उद्यान केदारेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण प्रभागातील पार्किंग सुविधांची उभारणी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व बैठक व्यवस्था भाजपच्या पाठबळामुळे विकासाला वेग : अश्विनी कुंभार “राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी माझ्यासह भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे, आमदार महेशदादा लांडगे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून शहरातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्याने तोडगा काढला जाईल. केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. राजगुरुनगरच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार भाजपला साथ देतील असा मला विश्वास आहे.” अश्विनी कुंभार यांची विकासनिष्ठ भूमिका, अनुभवी नेतृत्व आणि समाजातील सर्व घटकांशी असलेली जवळीक या सर्व कारणांमुळे प्रभाग ८ मधील निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. “माझ्या कुटुंबाला जनसेवेची परंपरा आहे. जनतेच्या पाठिंब्याने पाणी, कचरा, रस्ते, गटार, वीज यांसह अनेक प्रश्नांना प्राधान्याने हाताळणार आहे. केदारेश्वर मंदिर परिसर, हुतात्मा राजगुरू स्मारक यांचे सुशोभीकरण, मुलांसाठी मैदान, महिलांसाठी सुरक्षित वातावरण अशी कामे प्राधान्याने करणार आहे.” -अश्विनी कुंभार (भाजप उमेदवार)