प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने जामीनपात्र वॉरंट रद्द करून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे घटकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलीस हवालदारासह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७, पोलीस कॉन्स्टेबल, जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) आणि सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हे) या अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार (वय ५९, व्यवसाय – कापड व्यवसाय) यांच्या मुलाने सन २०१९ मध्ये सावकारकी कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या पत्नी साक्षीदार होते. त्या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरोधात जामीनपात्र वॉरंट निघाले असल्याचे सांगून, ते रद्द करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ५ डिसेंबर रोजी आरोपी पोलीस हवालदार दशरथ बनसोडे व सचिन चव्हाण हे तक्रारदाराच्या घरी गेले असता लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने दि. १० डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १० डिसेंबर रोजी पडताळणी कारवाई केली असता, आरोपी पोलीस हवालदार बनसोडे यांनी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच सचिन चव्हाण याने लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रोत्साहन दिल्याचेही निष्पन्न झाले. यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) करत आहेत.