जांबुत : पिंपरखेड (ता. शिरुर) येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. ०९) रोजी पहाटे सहा वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. आजूबाजूच्या परिसरात बिबट्या निदर्शनास येत असल्याने स्थानिकांच्या मागणीवरून शेतकरी रोहिदास टेमकर यांचे शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली. वनरक्षक लहू केसकर व महेंद्र दाते यांनी ही कारवाई करत बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले. मागील दोन महिन्यात तीन जणांच्या मृत्यूनंतर ऍक्शन मोडवर आलेल्या वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवत आत्तापर्यंत या परिसरात सुमारे २२ बिबटे जेरबंद केले आहेत. यामुळे स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी अद्यापही या भागात विविध ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येत असून वनविभागाने या कारवाया पुढे कायम चालू ठेवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्याच्या काळात ऊसतोडणीचा हंगाम चालू असल्याने बिबटे हे अन्न पाण्याच्या शोधात मुक्त संचार करत बाहेर येत आहे. वनविभागाकडून बिबट जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक वनसंरक्षक स्मिता यांनी केले आहे.