प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – जुन्नर वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील रस्ते,पिण्याच्या पाण्याची योजना,पथकर दिवे उभारणे इत्यादी विषयांवर वनविभागाचे पूर्ण सहकार्य करेल व या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी दिले. आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक, लाखणगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी व परिसरातील रस्ते व इतर समस्यांबाबत जुन्नर (ता.जुन्नर) येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. वनविभाग हद्दीतील काही रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर उपविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली.यामध्ये काठापूर बुद्रुक येथील वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभा उजवा कालवा कार रस्ता, लाखणगाव रोड ते काकडे-भुमकर वस्ती रस्ता वैदवाडी-पोंदेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा (पीरसाहेब मंदिर मार्गे) रस्ता करणे,लाखणगाव येथे कवठेरोड ते पाटील-तागडवस्ती रस्ता करणे, धामणी येथे मधलामळा ते स्मशानभूमी (बायपास मार्ग) रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाइपलाइनबाबत मार्ग काढणे, इत्यादी विषयातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करून आवश्यक निधी देखील उपलब्ध करून पूर्ण केले जाईल, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती संजय गवारी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, मंचर महावितरण विभागाचे अधिकारी तसेच लाखणगाव येथील माऊली पाटील,धामणीचे सरपंच अक्षय विधाटे,काठापूर बुद्रुकचे माजी उपसरपंच विशाल करंडे, सुधीर भुमकर, बाळासाहेब करंडे, महीपत टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते.