Ambegaon News – पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आंबेगाव तालुक्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीगत यश नसून वळसे पाटील कुटुंबाच्या सातत्यपूर्ण राजकीय परंपरेचे आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक मानली जात आहे. आंबेगाव तालुक्याच्या राजकीय इतिहासात वळसे पाटील कुटुंबाचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी, सन १९७९ मध्ये माजी आमदार व माजी जिल्हा परिषद सदस्य (स्व.) दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाली होती. त्या काळात त्यांनी केलेले काम आजही आदर्श मानले जाते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे नातू विवेक वळसे पाटील यांनी आजच्या पिढीत नेतृत्वाची परंपरा पुढे नेली आहे. विशेष म्हणजे, त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची संधी मिळणे ही आंबेगावच्या राजकीय प्रभावाचीच साक्ष ठरली आहे. यंदाच्या निवड प्रक्रियेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय रणनीतीचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठबळाचा मोठा प्रभाव दिसून आला. दिलीप वळसे पाटील या दोघांच्या समन्वयातून आंबेगाव तालुक्याला पुन्हा झुकते माप मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांच्या काळापासून बारामती-आंबेगाव यांच्यातील राजकीय व विकासात्मक नाते कायम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. या निवडीचे औचित्य साधून मंचर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात विवेक वळसे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विवेक वळसे पाटील यांनी अत्यंत संयत शब्दांत भावना व्यक्त केल्या. “हा सन्मान माझा नसून आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विवेक वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनीही या प्रसंगी बोलताना विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वळसे पाटील समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावोगावच्या विकासाला गती देतील,” असे त्यांनी नमूद केले.