Ambegaon Election – आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले असून पदयात्रा, प्रचार फेऱ्या, घरोघरी भेटी, तसेच गावोगावी वाड्या-वस्त्यांवर बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. त्यामुळे परिसरात पूर्णतः निवडणूक वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, दि.७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरल्याने उमेदवारांकडून प्रचाराला अधिक तीव्रता देण्यात येत आहे. आपल्या गट व गणातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे. प्रचार पत्रकांचे वाटप, पदयात्रा आणि प्रचार फेऱ्यांद्वारे उमेदवार स्वतःमतदारांच्या दारात पोहोचत आहेत. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात सकाळ व सायंकाळी भेटीगाठींवर भर देण्यात येत होता. मात्र, आता मतदानाची तारीख जवळ आल्याने दुपारच्या वेळेतही अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतःचे नाव व निवडणूक चिन्ह मतदारांच्या मनात ठसवण्यासाठी उमेदवारांची धावपळ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. या निवडणुकीत पारंपरिक प्रचारासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. पदयात्रा,चौकसभांवर भर पदयात्रा, चौकसभा आणि मतदार भेटींचे महत्त्व कायम असले तरी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप व एक्स यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे प्रचार पोस्ट, संदेश आणि आवाहने मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत.त्यामुळे समाजमाध्यमेच जणू उमेदवारांचे प्रचारदूत बनल्याचे चित्र दिसत आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचार अधिकाधिक हायटेक होत असून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करत असल्याचे दिसून येत आहे.