Alandi: श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाले. ह. भ. प. पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ अध्यक्षस्थानी होते. मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजीव कांबळे यांनी प्रास्ताविकातून भाषा दिन साजरा करण्यामागील हेतू व उद्दिष्टे विशद केली. पांडुरंग महाराज शितोळे यांनी संस्कृत भाषेपासून ते आजपर्यंत मराठी भाषेच्या स्थित्यंतरांचा आढावा घेताना संत ज्ञानेश्वर माऊलींचे साहित्य, मराठी भाषेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. मराठी भाषेला नुकत्याच मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे महत्त्व व त्याचे दीर्घकालीन लाभ त्यांनी विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मिसाळ यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे मराठी भाषेचा महिमा सांगताना नवीन शैक्षणिक धोरणातील मराठीचे स्थान अधोरेखित केले. “मराठीच्या सुमारे ५२ बोली आहेत आणि ती आपल्या रक्तातच संचारते, हेच तिचे वैभव आहे,” असे ते म्हणाले. संस्थेचे खजिनदार मयूर ढमाले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रा. रोहित कांबळे, प्रा. संतोष कदम, प्रा. प्रफुल्ल जाधव, प्रा. सविता मानके, प्रा. दीपाली ताम्हणे, प्रा. रणजीत कदम, प्रा. दीपाली सोनवणे, प्रा. माणिक कसाब, प्रा. दीपक देवकर, प्रा. प्रभाकर गायकवाड, प्रा. सीमा साळुंखे, प्रा. रूपाली औटी, प्रा. पूजा खोडकर, प्रा. सुरेंद्र पवार, प्रा. मीरा केसकर, प्रा. रेखा सुतार, प्रा. मीना शिंदे, प्रा. प्रतीक्षा शिंगाडे, प्रा. चित्रा पाटील, प्रवीण भावे, सचिन गावडे आदी उपस्थित होते. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले. आभार प्रा. ताम्हाणे यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा. देवानंद गोरडवार यांनी दिली.