Alandi: अखिल वारकरी गुरुकुल संघ, आळंदी देवाची यांच्या वतीने आळंदी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. गोपाळपुरा येथील देविदास धर्मशाळेत गुरुवारी सायंकाळी हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रामुख्याने ह.भ.प. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर बाबा आणि ह.भ.प. नारायण महाराज जाधव यांची उपस्थिती लाभली. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर यांच्यासह सर्व नगरसेवकांचा शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वारकरी संप्रदाय आणि प्रशासनाचा समन्वय – कार्यक्रमात बोलताना उपस्थित वक्त्यांनी वारकरी संप्रदायाची एकजूट आणि आळंदीची पवित्र प्रतिमा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे नमूद केले. “नगर परिषद आणि वारकरी संप्रदायाने एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहून शहराच्या विकासासाठी काम करणे आवश्यक आहे,” असा सूर यावेळी उमटला. महत्त्वाच्या मागण्या आणि संकल्प – Alandi शिक्षणाचा विस्तार: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नगरपालिकेच्या शाळांची व्याप्ती पहिली ते दहावीपर्यंत वाढवावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. इंद्रायणी स्वच्छता: नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजीक संस्था, नगरपरिषद आणि वारकरी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. मान्यवरांची उपस्थिती – या सोहळ्याचे नियोजन संघाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेळके, उपाध्यक्ष ह.भ.प. अनिता सुद्रिक, कार्याध्यक्ष संदीप महाराज लोहार आणि सचिव मनमोहन महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास किशोर महाराज धुमाळ, ज्ञानेश्वर महाराज जाधव, अनंत महाराज धर्मे, ज्ञानेश्वर महाराज तावरे, अंकुश महाराज कदम, माऊली महाराज सुरवडकर, कैलास महाराज गायकवाड, आदिनाथ सुटले गुरुजी, निरंजन शास्त्री कवठेकर, प्रल्हाद महाराज टकले, सोपान महाराज निकम, सुरेश महाराज काचगुंडे, ज्ञानेश्वर महाराज पिंगळे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत महाराज चौधरी व सतीश महाराज भिताडे यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अखिल वारकरी गुरुकुल संघाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. या सोहळ्यामुळे नगर परिषद आणि वारकरी संप्रदायातील सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना शहरवासियांनी व्यक्त केली.