प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी-मरकळ रस्त्यावरील चर्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख मार्गाच्या कडेला ओढा खोलीकरणातून पडलेला एक भला मोठा खड्डा सध्या वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा खड्डा तसाच उघडा असून, चर्होली खुर्द ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग (पूर्व) यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी पूर्वी असलेली नैसर्गिक मोरी बंद केल्याने पावसाळ्यात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेला हा खड्डा वाहनचालकांच्या सहज नजरेत न पडता मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो. विशेषतः दुचाकीस्वार, पादचारी व अवजड वाहनांसाठी हा खड्डा अत्यंत धोकादायक ठरत आहे. भविष्यात एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ शकतो, अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. येत्या पंधरा दिवसांच्या आत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर खड्डा तात्काळ बुजवावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित विभागांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.