प्रभात वृत्तसेवा आळंदी – नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे युवा उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी १२,७४२ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. हा विजय शिस्तबद्ध प्रचार, सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्ते चेतन नाना कुऱ्हाडे यांनी आखलेली रणनीती आणि जय गणेश ग्रुपने केलेले कार्य निर्णायक ठरले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच प्रचाराची प्रत्येक पायरी अत्यंत काळजीपूर्वक नियोजित करण्यात आली होती. प्रभागनिहाय रणनीती, बूथस्तरावरील नियोजन आणि मतदारांशी थेट संवाद यावर विशेष भर देण्यात आला. या मोहिमेत जय गणेश ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरांत जाऊन भेटी घेतल्या आणि विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यापासून ते मतदार यादी तपासणीपर्यंत सर्वच पातळ्यांवर कार्यकर्ते सक्रिय होते.चेतन नाना कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील या यंत्रणेने अनुभव आणि तरुणाईचा योग्य मेळ घातला. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या दणदणीत विजयामुळे आळंदीच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट झाले असून, नागरिकांनी प्रशांत कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. या यशाचे श्रेय आता चेतन नाना कुऱ्हाडे यांच्या नियोजनाला आणि जय गणेश ग्रुपसह सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठेला दिले जात आहे.