प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष, गटनेता व स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महत्त्वाच्या पदांवर कोणाची निवड होणार, याबाबत पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले असून पदवाटपावरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी सुनील घुंडरे, दिनेश घुले, खुशी बोरुंदीया आणि पुजा घुंडरे ही नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अंतिम निर्णय घेणे पक्षनेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, नगरपरिषदेमधील पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणार्या गटनेता पदासाठी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व रामचंद्र भोसले यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी नगरपरिषद कामकाजात सक्रिय भूमिका बजावल्याने या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी दर्शवली असून त्यामध्ये चेतन कुर्हाडे, गिरीष तुर्की, अजित वडगावकर, संजय घुंडरे, आकाश जोशी, दत्ता तापकीर, सचिन पाचुंदे, राहुल चिताळकर, तुषार घुंडरे, अविनाश तापकीर, नितीन घुंडरे, सुनिल रानवडे, प्रफुल प्रसादे, तुकाराम माने, गणेश गायकवाड आणि हर्षल पगडे यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयाकडे आळंदीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.