प्रभात वृत्तसेवा आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील पीएमपीएमएल बस स्थानकाचे पंधरा दिवसांपूर्वी विस्तारीकरण करून ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात आले आहे. या प्रक्रियेत पुणे विभागातून येणाऱ्या बसेस आळंदी देहू फाटा वाय जंक्शन येथील मोकळ्या जागेत हलवण्यात आल्या आहेत. मात्र, या नवीन ठिकाणी प्रवाशांसाठी कसल्याही प्रकारच्या निवाऱ्याची अथवा प्रकाशाची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे हडपसर, शेवाळेवाडी, खराडी, कात्रज, स्वारगेट, पुणे स्टेशन आणि कोथरूड यांसारख्या विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांना मुख्य आळंदीत जाण्यासाठी दीड किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हे स्थानक सुरू करण्यात आले असून, येथे दिवसभरातून लाखो प्रवाशी प्रवास करतात. रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून लूटमारीची भीतीही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात आळंदीतील ज्येष्ठ पत्र लेखक मुकुंद दिंडाळ यांनी स्वारगेट डेपोकडे लेखी स्वरूपात तक्रार करत जुन्या पुलाजवळील बस स्थानकावर या बसेस उभ्या करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पीएमपीएमएल प्रशासनाने पुणे विभागातील बसेस नवीन स्थानकाऐवजी आळंदीतील जुन्या बस स्थानकावर उभ्या कराव्यात आणि ज्या ठिकाणी प्रवाशांची संख्या मर्यादित आहे, अशा पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या बसेस नवीन स्थानकात हलवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल तातडीने करणे आवश्यक असल्याचे दिंडाळ यांनी नमूद केले आहे. ज्या प्रवाशांकडे पास आहे, ते देहू फाटा किंवा काटे कॉलनी येथे उतरून पुढील प्रवास करू शकतात, असेही सुचवण्यात आले आहे.