प्रभात वृत्तसेवा आळंदी – नववर्षाची सुरुवात भक्तीमय वातावरणात आणि देवदर्शनाने करण्याच्या परंपरेनुसार आज गुरुवारी (दि. 1) पहाटेपासूनच तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी माऊली मंदिरात हजारो भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण आळंदी नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आळंदीत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही पाहायला मिळाली. आज पहाटेपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी दर्शनबारीत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविक ज्ञानोबा-माऊली-तुकाराम असा जयघोष करीत दर्शनासाठी उत्साहाने सहभागी झाले होते. माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून भक्ती व आनंदाचा अनुपम संगम अनुभवायला मिळत आहे. माऊली मंदिरासह आळंदी परिसरातील इतर मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. श्री सिद्धेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावरही सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होती. अनेक भाविकांनी नदीपूजन व पवित्र स्नान करून नववर्षाची मंगलमय सुरुवात केली.यासोबतच भक्त पुंडलिक मंदिर, हजेरी मारुती मंदिर, श्री कालभैरवनाथ मंदिर तसेच नृसिंह सरस्वती स्वामी मठ आदी प्रमुख धार्मिक स्थळांवरही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. सकाळी प्रदक्षिणा मार्गावर व नदी घाट परिसरात अनेक दिंड्यांचे आगमन झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू असलेल्या हरिनाम संकीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आळंदी तीर्थक्षेत्री भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे विलक्षण दृश्य पाहायला मिळाले.