Alandi News – आळंदी नगरपरिषद हद्दीतील इंद्रायणी नदीवरील चाकण चौक ते इंद्रायणी नगर कमान दरम्यानच्या पुलाची दुरवस्था झाली असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाच्या तातडीच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.या दुरुस्ती कामासाठी संबंधित मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि. ८ फेब्रुवारी रात्री १० वाजेपासून ते दि. ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत चाकणकडून आळंदीकडे येणारी वाहने आळंदी फाटा किंवा चिंबळी फाटा मार्गे न येता भारत माता चौक, मोशी, देहू फाटा किंवा भोसरी–मॅगझिन चौक मार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच देहू फाटा व इंद्रायणी नगर कमान येथून नवीन पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, ही वाहतूक मरकळ चौक, वडगाव चौक किंवा बोपदेव चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. चाकण चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी धानोरे फाटा किंवा इंद्रायणी हॉस्पिटल चौकाचा वापर करून पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.