प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदीजवळ असलेल्या चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांच्या सीमेवर आणि सोसायट्यांच्या परिसरात आढळणारा बिबट्या आता खुलेआम वाड्या-वस्त्यांवर आणि थेट घरांपर्यंत येऊ लागल्याने चऱ्होलीकरांची रात्र वैऱ्याची झाली आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घराची राखण करण्यासाठी रात्रभर जागायचे, असा जीवघेणा दिनक्रम नागरिक अनुभवत आहेत. श्रीवाघेश्वर महाराज चौकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर, चऱ्होली-निरगुडी रस्त्यावरील भोसलेवस्ती येथे बिबट्याने दस्तक दिली आहे. शेतकरी अमोल कुडले यांच्या शेतात असलेल्या घराजवळ बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. सकाळी कुडले यांना घरामागे बिबट्याच्या पंजाच्या खुणा आणि रक्ताचे सांडलेले ठिपके दिसले. सध्या माळी पेठा, बुर्डे वस्ती, पठारे मळा, भोसले वस्ती यांसारख्या शेती आणि दाट झाडाझुडपांच्या परिसरात बिबट मादी आणि तिच्या दोन पिल्लांचे दर्शन लोकांना होत आहे. बिबट्याच्या भीतीमुळे नागरिक शेतातील काम सोडून पळ काढत आहेत. हिवाळ्यामुळे लवकर अंधार पडत असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून, या बिबट्याच्या संचारामुळे इतर सर्व कामांवर आणि व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. पाळीव कुत्रे आणि दुभत्या जनावरांवर हल्ला होत असल्याने ग्रामीण अर्थकारणावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. “बिबट्याने आमच्या घराजवळच आमच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. त्यामुळे आता घराबाहेर पडणे देखील धोक्याचे वाटू लागले आहे. घराच्या आजूबाजूला शेती आहे. घर आणि शेती सोडून तर जाता येत नाही आणि बिबट्याही आहेच. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.” – अमोल कुडले, शेतकरी