प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत आज (1 जानेवारी) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास मरकळ रस्त्यावर भीषण अपघात झाला. कुरुळी सोनवणे वस्ती येथून आळंदी-मरकळ मार्गे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी जात असलेली पिकअप गाडी (एमएच 14 एलबी 3097) मरकळ गावच्या हद्दीत रविन केबल कंपनीसमोर उलटली. वाहनाच्या मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांच्या वजनामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप गाडी रस्त्यावर उलटली. या अपघातात एकूण 28 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आळंदी, के. के. हॉस्पिटल आळंदी, वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे दाखल करण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.