प्रभात वृत्तसेवा अकलूज – गुंतवणुकीवर दरमहा जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या कंपनी व संबंधित व्यक्तींविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील फिर्यादी महिला या अकलूज (ता. माळशिरस) येथील रहिवासी आहेत. त्यांची तसेच इतर गुंतवणूकदारांची फसवणूक नवनाथ जगन्नाथ अवताडे (रा. फळवणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर; सध्या रा. राजश्री शाहू सोसायटी, बिबवेवाडी, पुणे), शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे, अशोक आगतराव पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस), उमा अशोक पवार व आदेश अशोक पवार यांनी केल्याचा आरोप आहे. आरोपींनी इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्व्हिसेस, आय.बी. प्रो डेस्क कंपनी तसेच मास्टर्सायनर्जी एड्युटेक एलएलपी या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. यामध्ये फिर्यादीकडून तब्बल 24 लाख 50 हजार रुपये, तसेच इतर 14 गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र, कोणताही परतावा न देता तसेच मूळ गुंतवणूक रक्कमही परत न करता गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 815/2025 अन्वये महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता तपासादरम्यान सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांकडून आरोपींनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक स्वीकारल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तसेच आरोपींची संख्या वाढू शकते. गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्व्हिसेस, आय.बी. प्रो डेस्क कंपनी, मास्टर्सायनर्जी एड्युटेक एलएलपी किंवा अशा स्वरूपाच्या अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीची कागदपत्रे घेऊन अकलूज पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अकलूज पोलिसांनी केले आहे.