Ajit Pawar – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं नेतृत्व आणि जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमचे ‘दादा’ आज आपल्यात नाहीत, ही वार्ता पचवणं खरोखरच कठीण आहे. कधीकधी नियती इतकी क्रूर असू शकते की, आयुष्यात पहिल्यांदाच एखादी बातमी ‘फेक न्यूज’ ठरावी असं मनापासून वाटू लागतं. अशी प्रतिक्रिया माझी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, विकासासाठी आणि इथल्या मातीतील शेवटच्या माणसाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस धावणारी ती पावलं, अशी अचानक थांबतील, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हत. काळाने आपल्यावर झडप घातली आणि एका पहाडासारख्या व्यक्तिमत्वाचा अंत झाला, ज्याने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिघात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण केली आहे. माझ्या भावना केवळ एका सहकाऱ्याच्या नसून त्या एका प्रदीर्घ प्रवासातील साक्षीदाराच्या आहेत. १९९० पासूनचा तो काळ माझ्या डोळ्यांसमोरून सरकत आहे. मग ती पुणे जिल्हा बँक असो, विधानमंडळ असो किंवा मंत्रिमंडळ; प्रत्येक टप्प्यावर दादांचा सहवास हा मार्गदर्शक आणि ऊर्जा देणारा ठरला. विधानसभेच्या पायऱ्या पहिल्यांदा चढण्यापासून ते राज्याच्या हिताचे मोठे निर्णय घेण्यापर्यंत दादांचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला. अजित पवार त्यांच्यासोबत काम करताना केवळ प्रशासन समजले नाही, तर अडचणीत असलेल्या माणसाला आधार कसा द्यायचा, हे तंत्रही शिकायला मिळाले. मग तो मतदार संघातील विकासकामांचा प्रश्न असो किंवा पुणे जिल्ह्याच्या अस्मितेचा, दादा नेहमीच ढाल बनून उभे राहिले.”दादांच्या अस्तित्वाने राजकारणात चैतन्य असायचे. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र एका कणखर आणि लाडक्या नेतृत्वाला मुकला आहे.” दादांची काम करण्याची पद्धत म्हणजे एक शिस्तबद्ध ‘अकादमी’ होती. त्यांच्या कामाची सुरुवात पहाटे सहा वाजल्यापासून व्हायची, ती थेट रात्री उशिरापर्यंत. समाजसेवा आणि लोकसेवेसाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत त्यांची एक घट्ट नाळ बांधलेली होती. दादांच्या स्वभावातील सर्वात मोठ वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. काम होणार असेल तर ‘हो’ आणि नसेल होणार तर स्पष्ट ‘नाही’ म्हणण्याच धाडस त्यांच्यात होत. समोरच्याला खोट्या आशेवर ठेवणं त्यांच्या रक्तात नव्हत. पक्ष संघटना कशी बांधावी आणि ती तळागाळापर्यंत कशी पोहोचवावी, हे आम्हाला दादांकडूनच शिकायला मिळालं.अलीकडच्या काळात बिबट्यांच्या दहशतीसारखा गंभीर प्रश्न उद्भवला, तेव्हाही दादांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देते. सुख असो वा दुःख, विकासकामे असोत वा आकस्मिक संकट, दादांचा शब्द आणि त्यांची उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्यांमध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण करत असे. जनसेवेचा वसा पुढे नेण हीच आदरांजली आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मन हेलावून जातं. दादा, तुमच्या आठवणी आता काळजात कायम राहतील. तुम्ही दाखवलेला विकासाचा मार्ग आणि जनसेवेचा वसा पुढे नेणं हीच तुम्हाला दिलेली खरी आदरांजली ठरेल.