Ajit Pawar – महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शिरूर तालुक्यात मोठी राजकीय व सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने राज्यासह शिरूर तालुक्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून, याचा थेट परिणाम भविष्यातील विकासकामांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचे शिरूरशी जिव्हाळ्याचे नाते होते; पाणीप्रश्न, रस्ते, औद्योगिक वसाहती आणि सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी नेहमीच निर्णायक भूमिका बजावली होती.शिरूर तालुक्यातील अनेक रखडलेले प्रकल्प अजित पावार यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागले होते. मंत्रालयातून थेट फोन करून प्रश्न सोडवण्याची त्यांची कार्यशैली सर्वश्रुत होती, म्हणूनच त्यांना तालुक्याचा आधारस्तंभ मानले जाई. आज त्यांच्या निधनामुळे शिरूर शहरासह तालुक्यातील सर्व गावे आणि शासकीय कार्यालयांनी कडकडीत बंद पाळून शासकीय दुखवटा पाळला आहे. त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेणे हेच आता तालुक्यातील कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. “अजितदादांच्या अकाली निधनामुळे शिरूर तालुक्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकासकामांसाठी आवश्यक असलेली राजकीय ताकद आणि प्रशासकीय समन्वय असलेले नेतृत्व अचानक नाहीसे झाल्याने अनेक प्रस्तावित प्रकल्प आणि निधीच्या प्रतीक्षेत असलेली कामे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मला त्यांची खंबीर साथ मिळाली.” – अशोक पवार, माजी आमदार, शिरूर-हवेली “अजितदादांच्या मृत्यूची घटना मनाला अतिशय दुःख देऊन गेली. राज्यातील एक अत्यंत कर्तबगार आणि चांगला प्रशासक आज महाराष्ट्राने गमावला आहे. राजकीय कारकिर्दीबरोबरच सामाजिकदृष्ट्याही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.” – पोपटराव गावडे, माजी आमदार, शिरूर “अजितदादांनी जात, पक्ष आणि गटबाजी पलीकडे जाऊन शिरूर-आंबेगाव परिसरात दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला. रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष देऊन या भागाचा विकास केला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून अशी पोकळी भरून निघणे अशक्य आहे.” – अरुणा घोडे, पंचायत समिती सदस्य, दामुआण्णा घोडे, सरपंच, टाकळी हाजी