Ajit Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सहकार आणि कृषी क्षेत्राला दिशा देणारे नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच, इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली. अजितदादांशी जिव्हाळ्याचे, ऋणानुबंधाचे नाते असलेल्या इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सहकारी नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी थेट बारामती गाठत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे पृथ्वीराज जाचक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, वैशालीताई पाटील, इंदापूर शहरातील सर्व नगरसेवक, तसेच विविध राजकीय पक्षांतील व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले असंख्य कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. इंदापूर तालुक्यावर अजितदादा पवार यांचा विशेष जिव्हाळा होता. बारामती तालुक्यापेक्षाही इंदापूर तालुक्याच्या हद्दीतूनच अजितदादांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यामुळे तब्बल 140 गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी अजितदादांचे घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले होते. अजितदादांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे इंदापूर तालुका ठामपणे उभा राहत असल्याचे चित्र सातत्याने दिसत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार यांनी इंदापूर तालुक्याला दिलेली राजकीय ताकद हीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीचे प्रमुख कारण ठरली. तालुक्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी विचारांशी जोडले गेले. त्यामुळे पवार कुटुंबीयांबद्दल इंदापूर तालुक्यात विशेष आपुलकी निर्माण झाली. निधनाची बातमी कळताच बारामतीकडे इंदापूरकरांची अक्षरशः रीघ लागली होती. दरम्यान, भाजप नेते प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने यांच्यासह सर्वपक्षीय नेते बारामतीत दाखल झाले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. “इंदापूर तालुक्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्राचा कणा मजबूत करण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा होता. इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणार्या विविध संस्थांना सक्षम करण्यासाठी अजितदादांनी सातत्याने पाठबळ दिले. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून घेतलेले धोरणात्मक निर्णय, बाजार समिती व खरेदी-विक्री संघांच्या माध्यमातून शेतमालाला योग्य दर मिळवून देण्याचे प्रयत्न आणि सहकारातून विकासाची दिशा देणारी त्यांची भूमिका यामुळे इंदापूर तालुक्याच्या कृषी व सहकार क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला.” – आप्पासाहेब जगदाळे, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक “अजितदादा हे कार्यकर्त्यांचे पालक होते. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला घडवणारे नेतृत्व आज हरपले. इंदापूर तालुक्याच्या राजकीय वाटचालीचा कणा अजितदादा होते.” – प्रतापराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य “इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावाशी अजितदादांचे नाते होते. सहकार, राजकारण आणि समाजकारण यांचा समतोल साधत त्यांनी पिढ्यान्पिढ्या कार्यकर्ते घडवले. आज तालुक्याचा आधारवड कोसळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने इंदापूर तालुक्याने आपला मार्गदर्शक, आधार आणि विश्वासाचे नेतृत्व गमावले असून संपूर्ण तालुका शोकमग्न झाला आहे.” – श्रीमंत ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य