Ajit Pawar – इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिलेले एक निवेदन, आणि अवघ्या काही मिनिटांत सुरू झालेली प्रशासनाची चक्रे फिरली ही घटना म्हणजे कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणार्या अजित पवार कार्यशैलीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देऊन इंद्रायणी सेवा फौंडेशनचे कार्यकर्ते बाहेर पडले असतानाच, अवघ्या पाच मिनिटांत दादांनी त्यांना परत बोलावून घेतले. निवेदन बारकाईने वाचल्यानंतर दादांनी कोणतीही दिरंगाई न करता, थेट जिल्हाधिकार्यांना फोन लावला. अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या समोरच जिल्हाधिकार्यांना इंद्रायणी नदी प्रदूषणासंदर्भात तात्काळ बैठक आयोजित करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. ‘फाईल फिरवू नका, आजच बैठक घ्या,’ अशा शब्दांत दादांनी प्रशासनाला गती दिली. यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला आणि इंद्रायणी नदी संदर्भात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक निश्चित झाल्याची माहिती देण्यात आली. विशेष बाब म्हणजे, पुढील अर्ध्या तासातच संबंधित बैठकीचा अधिकृत आदेश (जीआर) कार्यकर्त्यांच्या हाती पडला. निवेदन, आदेश आणि कृती-हे सारे एका तासाच्या आत घडल्याने उपस्थित सर्वजण स्तिमित झाले. आज अनेक प्रश्न निवेदनांपुरतेच मर्यादित राहतात; मात्र आश्वासनांपलीकडे जाऊन निर्णय, आदेश आणि अंमलबजावणी यांचा वेग दाखवणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. लोकांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता, प्रशासनावरची पकड आणि कामातील वेग यामुळेच ‘कामाचा माणूस’ अशी ओळख दादांनी निर्माण केली. आज त्या आठवणी मनात उजळून निघतात.