Ajit Pawar – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त जेजुरी नगरीत थडकताच अवघ्या शहरवासीयांना प्रचंड धक्का बसला. सुरुवातीला विश्वास न बसलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवरून संपर्क करायला सुरुवात केली. घडलेली दुःखद घटना सत्य असल्याची जाणीव होताच व्यापारी – व्यावसायिकांनी आपापली दुकाने स्वतःहून बंद करण्यास सुरुवात केली. सकाळी अकराच्या दरम्यान पूर्ण शहराच्या व्यापारपेठेत शुकशुकाट पसरला होता. राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक प्रतिनिधी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्यासह काहीजणांनी तडक बारामती गाठली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रमिह लेंडे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक अस्लम पानसरे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवार यांची जन्मतारीख, दुर्दैवी मृत्यूचा योगायोग दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या स्टेटसवर दुर्दैवी योगायोग ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली ठेवली होती. पुरंदरवर लक्ष केंदित जेजुरी नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी जेजुरीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस त्यांनी प्रचारसभा घेत खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सासवड येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर बारामती मार्गस्थ होताना जेजुरीत काही नगरसेवकांशी भेट घेत संवाद साधला होता. ही त्यांची शेवटच्या भेट ठरल्याची खंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.