Ajit Pawar – स्व. अजित पवार यांच्या अस्थींकलशाचे गुरुवारी (दि.५) दुपारी जेजुरी नगरीमध्ये एका रथातून आगमन होताच जेजुरीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे, परत या परत या अजितदादा परत या या घोषणांनी परिसर भावनिक होऊन गेला. यावेळी जेजुरी नगरपालिका सभागृहाला अजितदादांचे नाव देणार असल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले.नगरपालिका प्रांगणात ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, जालिंदर कामठे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे, शिवसेना शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. अस्थीकलश असलेला रथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास कऱ्हा नदीतीरावरील मल्हार सागर जलाशयात विधिवत अस्थी विसर्जन करण्यात आले. आमचा राजकीय आधार हरपला नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत (स्व) अजितदादांनी मला पक्षाची उमेदवारी देऊन सर्वतोपरी बळ दिले होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला जेजुरीत प्रचारसभा घेत सत्ता द्या, निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. योगायोगाने प्रचार सभेचा दिवस गुरुवार होता. दुर्दैवाने आज अस्थी जेजुरीत येण्याचा वार गुरुवारच आहे. आमचा राजकीय आधार हरपला आहे. पुढील काळात (स्व) दादांच्या आचार -विचारांचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न राहील. नगरपरिषदेतील सभागृहाला दादांचे नाव देणार असल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई व रोहिदास कुंभार यांनी सांगितले.