प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे- दौंड लोहमार्गावर भरधाव चाललेल्या रेल्वेने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिक जागीच मृत्यूमुखी पडले. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शेल पेट्रोलपंपाच्या पाठीमागील लोहमार्गावर रविवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बाळासाहेब भिकोबा महानवर (वय. ७२, रा. बोरकर वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. बाळासाहेब महानवर हे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते किर्तन, प्रवचनात रमले होते. महानवर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या शेताकडे रविवारी सकाळी चालले होते. महानवर हे लोहमार्ग ओलांडत असताना, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने चाललेल्या रेल्वे गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. यात महानवर हे जागेवरच निपचित पडले होते. नागरिकांनी याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे व सहकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी जखमी महानवर यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.दरम्यान, महानवर यांच्या निधनामुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. यावेळी सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. महानवर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी सोमनाथ महानवर यांचे ते वडील होत.