प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे पहाटेच्या सुमारास घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. सलग घडलेल्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी सिंधु पाडुरंग भोंग (वय 65, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात तीन ते चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे पती पाडुरंग भोंग यांना घराबाहेर बसवून घेतले. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेले दोन ते तीन अनोळखी उघड्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांची बहीण मुक्ताबाई यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व डोरले, तसेच मुक्ताबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी, कानातील फुले व राजकाड्या जबरदस्तीने काढून घेतल्या. घरातील एलईडी टीव्ही व रोख रक्कम असा एकूण सुमारे 91 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पांढर्या रंगाच्या जीपसदृश चारचाकी वाहनातून फरार झाले.दरम्यान, याच वेळेस बागलफाटा बावडा परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली. आबासाहेब शिवाजी बागल यांच्या घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या त्यांच्या आई शांताबाई बागल यांच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तीन ते चार अनोळखी इसमांनी बळजबरीने काढून घेतले व पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पलायन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत असून, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.