प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – राज्यभर नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांवर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांचे मनोबल उंचावले आहे. विशेष म्हणजे, शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीची पकड मानली जात होती. परंतु, महापालिका निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतः पुणे जिल्ह्यात तळ ठोकला होता, तरीही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाने राजकीय चित्र पालटले असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अनेक इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपच्या तंबूत शिरण्यासाठी इच्छुक आहेत.शिक्रापूर-सणसवाडी या जिल्हा परिषद गटात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे आणि माजी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे या दोघीही एकाच पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. पक्षाकडून उमेदवारी कोणा एकालाच मिळणार हे निश्चित असल्याने, डावलले जाणारे इच्छुक उमेदवार आता बंडखोरीच्या तयारीत आहेत किंवा दुसऱ्या सक्षम पक्षाच्या शोधात आहेत. महापालिकेतील भाजपच्या यशानंतर अनेकांच्या नजरा आता भाजपच्या उमेदवारीकडे वळल्या आहेत. सध्या या गटात भाजपच्या वतीने पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत असतानाच, राष्ट्रवादीचा एक प्रभावी चेहरा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात गुप्त बैठका आणि राजकीय हालचालींना वेग आला असून, लवकरच हा चेहरा लोकांसमोर येणार आहे. हा प्रवेश झाल्यास शिक्रापूर-सणसवाडी गटातील जिल्हा परिषदेची लढत अत्यंत चुरशीची होणार असून, राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यात कडवे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच… पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी बहुतांश उमेदवार निवडून आल्याने राजकीय वर्तुळात आता ‘निवडणूक जिंकायची असेल तर भाजपच’ असा समज सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दृढ झाला आहे. यामुळेच जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्यापूर्वी अनेक बड्या नेत्यांचा कल भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.