वाघोली – वाघोली येथे पहाटे एकच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी कोयत्याची दहशत करून वाघोली मधील एका गाडीचे व सीसीटीव्हीचे नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनी कोयत्याची दहशत पसरवणाऱ्या युवकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाघोलीमध्ये कोयत्याद्वारे पाच ते सहा युवकांनी दहशत करण्याचा प्रकार केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव यांनी सांगितले की, वाघोलीमध्ये पहाटेच्या सुमारास पाच ते सहा युवकांनी कोयता फिरवत दहशत पसरवण्याचा प्रकार केला असून वाघोली पोलिसांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर कारवाई करावी. वाघोली पोलीस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात – वाघोली परिसरामध्ये गुटखा व गांजा मोठ्या प्रमाणात पकडण्यात येत आहे. अशा कारवाईमधून पोलीस आपली चांगली ओळख निर्माण करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली असताना दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची मिरवणूक काढून का कारवाई करत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वाघोलीत पोलीस चौक्या उभारण्याची गरज – वाघोली पोलीस ठाणे अंतर्गत वाघोलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पोलीस अधिकारी व कर्मचारी देऊन वाघोली परिसरात सध्या केसनंद एकमेव चौकी कार्यान्वित आहे. इतर भागात आवळवाडी मांजरी परिसर यासाठी तसेच वाघेश्वर मंदिर परिसरासाठी पोलीस चौक्यांची उभारणी करून अधिकाऱ्यांची नेमणूक करून कामकाज केल्याने गुन्हेगारांवर वचक व नागरिकांना तातडीने मदत मिळण्यास उपयोग होईल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.