प्रभात वृत्तसेवा मंचर – जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी आंबेगाव तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. राज्यभर एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आंबेगाव तालुक्यात मात्र एकत्र येत राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी केल्याचे बुधवार, दि.२१ रोजी स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या अनोख्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.जारकरवाडी या पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोहिणी दिलीप वाळुंज यांचा उमेदवारी अर्ज घोडेगाव तहसील कार्यालयात दाखल करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी शिवसेना (उबाठा) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम हेही उपस्थित होते.अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तीन वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांचे प्रमुख नेते एकाच ठिकाणी दिसल्याने दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी तालुकास्तरावर आघाडी झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. जरी दोन्ही शिवसेनेच्या अधिकृत युतीची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी प्रत्यक्ष मैदानात उमेदवारांच्या अर्जावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांची उपस्थित राहणे हे मोठे राजकीय संकेत मानले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काॅंग्रेसला आव्हान देण्यासाठी ही आघाडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील स्थानिक प्रश्न, शेतकरी, ग्रामीण विकास आणि सत्तासमीकरणे लक्षात घेऊन वैचारिक मतभेद बाजूला ठेवत ही आघाडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.