प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भरत शहा यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारताच शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना भरत शहा म्हणाले, नगरपालिका म्हणजे सत्तेचे केंद्र नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ आहे. शहरातील कोणत्याही नागरिकावर विकासकामांमध्ये दुजाभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा स्पष्ट संकेत दिला. इंदापूर शहराचा नियोजित व सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जातील, असे शहा यांनी स्पष्ट केले. राजकीय समन्वय आणि प्रशासकीय शिस्त यांचा योग्य संगम साधत शहराचा विकास गतीने पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, व्यापारी वसाहतींचा विकास तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. विकासकामे करताना पारदर्शकता, गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेची शिस्त पाळली जाईल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. नगरपालिका हेच आपले कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे हेच माझे कर्तव्य आहे. शहराच्या विकासासाठी केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामावर भर दिला जाईल, असे सांगत भरत शहा यांनी आपल्या नेतृत्वशैलीचा स्पष्ट आराखडा मांडला. नगरपरिषद प्रशासन, नगरसेवक आणि नागरिक यांच्यात समन्वय राखून लोकसहभागातून विकास हे धोरण अवलंबले जाईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना व्यक्त केलेला राजकीय संयम, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक भूमिका यामुळे इंदापूर शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या असून, आगामी काळात नगरपालिकेच्या माध्यमातून ठोस बदल घडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.