प्रभात वृत्तसेवा ओतूर – परिसरात बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. अमीरघाट परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या ४८ तासांच्या अंतराने दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामध्ये एका सहा ते सात वर्षे वयोगटातील मादीचा आणि एका सात महिने वयाच्या बछड्याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी या परिसरात एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्यापासून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. लोकांच्या मागणीनुसार वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. सोमवारी (दि. २२) रात्री प्रथम सात महिने वयाचा बछडा जेरबंद झाला. त्यानंतर बुधवारी (दि. २४) रात्री दहा वाजेच्या सुमारास याच परिसरात सहा ते सात वर्षे वयाची बिबट मादी पिंजऱ्यात अडकली. वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले आणि त्यांच्या पथकाने या दोन्ही बिबट्यांना ताब्यात घेऊन सुरक्षितपणे माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवले आहे.या मोहिमेत सोमनाथ ठिकेकर, सचिन दाते, मिथील इसकांडे, सागर दाते, अमोल ठिकेकर यांसह स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला मोलाचे सहकार्य केले. ओतूर परिसरात दिवसाढवळ्या होणारे बिबट दर्शन शेतकरी आणि नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने हा प्रश्न गंभीर झाला होता. दोन बिबटे जेरबंद झाल्याने सध्या समाधान व्यक्त होत असले, तरी या परिसरात अजूनही अन्य बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाकडून या भागावर विशेष लक्ष ठेवले जात असल्याची माहिती चैतन्य कांबळे यांनी दिली आहे.