प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – राज्यभरात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा होताच पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-सणसवाडी गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाच वेळी तीन प्रमुख महिला उमेदवार इच्छुक रांगेत असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाला आहे. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, कासारी आणि वाडा पुनर्वसन अशा मोठ्या गावांचा समावेश असलेल्या या गटातील चुरस आता शिगेला पोहोचली आहे.या गटातून सध्याच्या जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवत मतदारसंघात जनसंपर्क सुरू ठेवला आहे. दुसरीकडे, माजी सभापती मोनिका हरगुडे यांनीही याच गटातून प्रबळ दावा केला असून, त्यांनीही जोमाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, रेखा बांदल यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने हा संघर्ष त्रिकोणी झाला आहे. रेखा बांदल यांनीही या गटातून प्रचाराला सुरुवात केल्याने पेच वाढला आहे.तीनही महिला उमेदवारांनी देवदर्शन सहली आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवला आहे. मात्र, पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, यावर या गटाचे भवितव्य अवलंबून आहे. उमेदवारी नाकारल्यास उर्वरित उमेदवार अपक्ष लढणार की दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार, यावरही चर्चा रंगू लागली आहे. या सर्व परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार माऊली कटके कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिक्रापूर जिल्हा परिषद गटातील शिक्रापूर आणि सणसवाडी पंचायत समिती गणातून आता पंचायत समितीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. यामध्ये शिक्रापूरचे सरपंच आबासाहेब करंजे, संजय जगताप, रामभाऊ सासवडे, पंढरीनाथ गायकवाड, राजेंद्र मांढरे, कासारीचे माजी सरपंच संभाजी भुजबळ, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, मनीषा गव्हाणे आणि सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदा दरेकर हे विविध पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.