आळंदी : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आळंदी येथील प्रसिद्ध ‘आवारी हॉस्पिटल’ने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘बेटी बचाव जनआंदोलन’ अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास (नॉर्मल डिलिव्हरी) संपूर्ण हॉस्पिटलचे बिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून आळंदी पंचक्रोशीत आरोग्य सेवा देणारे आवारी हॉस्पिटल हे या भागातील पहिले हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि समाजात स्त्री जन्माबद्दल सकारात्मकता निर्माण व्हावी, या उद्देशाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाव जनआंदोलनास’ आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गर्भवती महिलांसाठी विशेष सवलती – केवळ बिल माफीच नव्हे, तर जानेवारी महिन्यात हॉस्पिटलने इतरही अनेक महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. मोफत तपासणी: १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत परिसरातील सर्व गर्भवती महिलांचे चेकअप मोफत केले जाणार आहे. रक्त तपासणीत सवलत: गर्भवती महिलांच्या रक्त तपासणीमध्ये ५०% पर्यंत सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आवारी हॉस्पिटलच्या या निर्णयाचे आळंदी व पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत असून, “बेटी बचाव, बेटी पढाओ” या अभियानाला यातून मोठे बळ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी हॉस्पिटलच्या ९८५००६६१४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.