प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषदेसाठी शनिवार (दि. २०) रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तत्पूर्वी शुक्रवार (दि. १९) रोजी निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वतीने बारामती नगरपरिषदेसमोरील शारदा प्रांगणामध्ये गुरुवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ६ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सांगता सभा होनार आहे. निवडणूकीत अजितदादांनी विरोधकांना बरोबर घेतलं आहे. मात्र काही प्रभागांमध्ये चुरशीची लढत होत असल्यामुळे उद्याची सभा महत्वाची ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बारामती नगरपरिषदेवर अजितदादांची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यातच या निवडणुकीत अनपेक्षितपणे विरोधकांनाही सामावून घेण्यात राष्ट्रवादीला (अजित पवार) यश आले. निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र होतं. मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. बारामती शहरातील प्रभाग क्र. ३, ५, १३, १४, १५ आणि १७ मधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी पक्षाकडून तिकीट नाकारलेल्या नाराजांसह स्थानिक विरोधकांनी जोर लावला असल्याने प्रभागांमधील निवडणुक चुरशीची होणार आहे. प्रत्येक निवडणुकीत अजितदादा उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत. मात्र यावर्षी राज्यभरातील निवडणुकांचा व्याप असल्याने अजितदादांना फारसा वेळ देता आला नाही. त्यामुळे अजितदादा नाराजांबाबत सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.