रांजणगाव – कोंढापुरी ता. शिरूर येथील गट नंबर ५३१ मधील जमिनीच्या प्रकरणात महसूल विभागाच्या कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रांजणगाव गणपती येथील मंडल अधिकारी व कोंढापुरी येथील कामगार तलाठ्याच्या कार्यपद्धतीमुळे महसूल यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २०१४ साली मयत झालेल्या कमला तुकाराम ओव्हाळ या महिलेच्या नावाने ३० एप्रिल २०२४ रोजी फेरफार नोंदीची नोटीस पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीच्या नावाने नोटीस पाठवली जाणे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून, जमिनीतील संभाव्य गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. सदर प्रकरणात फेरफार नोंदी करताना मूलभूत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे वारसदारांचे हक्क धोक्यात येण्याची शक्यता असून, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच कोंढापुरी येथील गट नंबर ५३१ मधील सर्व फेरफार नोंदींची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व संबंधित कुटुंबीयांकडून होत आहे. महसूल प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.