प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीचा महिनाभर रंगलेला प्रचार, दैनंदिन धावपळ आणि मतदानाचा दिवस संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तब्बल ६८.८७ टक्के मतदान केले आहे. नामांकनानंतर लगेच सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आणि लक्ष्मी दर्शनामुळे चर्चांना उधाण आले होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्या अगोदरच प्रभाग क्रमांक एकमध्ये पुरूष नगरसेवक पदासाठी एक कोटींच्या पुढे तर महिला नगरसेवक पदासाठी २० लाखांपेक्षा जास्त रक्कमेची बोली लागल्याच्या चर्चेमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पैसेवाटप आणि गैरसमजातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून झालेल्या मारहाणीचा मुद्दाही चर्चेत राहिला. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि एक अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात होते. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेश लांडगे आणि आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सभांनी रंगत आणली. मतदानाच्या दिवशीही खरी लढत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेतच होणार असल्याची चर्चा होती. लक्ष्मी दर्शन चर्चेत निवडणुकीत मतदारांना सर्रास ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याच्या चर्चा शहरभर रंगल्या. एका मताला एक हजार ते पाच हजार रुपये मिळाल्याचे बोलले जात असून, साड्या, स्वेटर यांसारखी प्रलोभनेही दिल्याची माहिती समोर येत आहे. निकालानंतरच या सर्व गोष्टींचे खरे स्वरूप समजणार आहे. प्रत्येक उमेदवार स्वतःच जिंकणार असल्याचे दावे करीत असल्याने मतदारांमध्येही वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून किरण आहेर, शिवसेनेकडून मंगेश गुंडाळ, भाजपकडून शिवाजी मांदळे, उबाठा गटाकडून बापू थिगळे आणि एक अपक्ष उमेदवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तसेच एकूण १० प्रभागांतील २१ नगरसेवक जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १८ जागांसाठी ५६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे मतदान झाले. चुरशीची लढत झाली… उमेदवारांची मोठी संख्या असल्याने ही लढत चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपदासाठी १, नगरसेवकपदासाठी १६, शिवसेनेने अध्यक्षपदासाठी १, नगरसेवकपदासाठी १८, भाजपने अध्यक्षपदासाठी १, नगरसेवक पदासाठी १३ उमेदवार दिले होते. उबाठा गटाने फक्त अध्यक्षपदासाठी उमेदवारी देत नगरसेवकपदासाठी एकही उमेदवार न दिल्याने सर्वांना बुचकळ्यात पाडले आहे. सत्तेची गणिते मांडण्यात सर्व व्यस्त राजगुरूनगर नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने जोरदार मेहनत घेतली. परंतु, मतदानापूर्वी आणि नंतरही लक्ष्मी दर्शनामुळे कोण बाजी मारणार? याची गणिते गुंतागुंतीची झाली आहेत. नागरिकांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील, असे संकेत दिसत असले तरी शिवसेना व भाजपची ताकदही मोठी असल्याने त्यांचेही नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. निकालापर्यंत राजगुरूनगरमधील राजकीय वातावरण तंग आणि उत्सुकतेचे राहणार आहे.