प्रभात वृत्तसेवा आळेफाटा – जुन्नर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधीच राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, तब्बल ४४ हजार नव्या मतदारांची भर पडल्याने सर्वच पक्षांचे गणित नव्याने मांडले जाणार आहे. जुन्नर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीमुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत एकूण २ लाख ६३ हजार २०९ मतदार होते. त्या तुलनेत यावेळी तब्बल ४४ हजार १४ मतदारांची वाढ झाल्याने ‘जुने मतदार विरुद्ध नवे मतदार’ असे समीकरण निर्माण झाले आहे. स्थलांतर, नवमतदार, महिला मतदारांचे वाढते प्रमाण यामुळे कोणाचे पारडे जड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी एक गट व दोन गण वाढल्याने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आठ, तर पंचायत समिती सदस्यांची संख्या सोळा झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढणारच, पण पक्षांतर्गत स्पर्धाही अधिक तीव्र होणार आहे. आठ गटांपैकी बारव-पाडळी गटात सर्वाधिक ४१ हजार ३०२ मतदार असल्याने हा गट निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल आळे-पिंपळवंडी, डिंगोरे-उदापूर, बेल्हे-राजुरी हे गटही निर्णायक ठरू शकतात. महिला मतदार निर्णायक ठरणार तालुक्यात महिला मतदारांचे प्रमाण वाढल्याने यावेळी विकास, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, महिला सक्षमीकरण असे मुद्दे निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे ‘मतदारसंख्या वाढ’ ही केवळ आकडेवारी न राहता, जुन्नरच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट देणारी ठरणार आहे. ४४ हजार नव्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकणार? याचे उत्तर निवडणुकीच्या रणधुमाळीतच स्पष्ट होणार आहे. मतदारसंख्येत लक्षणीय वाढ नगरपरिषद क्षेत्र वगळता तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गणांमध्ये आता एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार ३५५ असून ती पुरुष मतदारांपेक्षा लक्षणीय ठरली आहे. पुरुष मतदार १ लाख ५५ हजार ८३३, तर इतर मतदार ५ असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.