प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे १० गण अशा एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी तालुक्यात २४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवारपासून (दि. १६) वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सुरू होत असून, मतदान व मतमोजणीचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार (दि. १६ जानेवारी) रोजी जिल्हाधिकारी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत (दि. २७ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम यादीनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२६) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. २ लाखांहून अधिक मतदार मतदानासाठी सज्ज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात एकूण २,००,३१६ मतदार आहेत. यामध्ये १,०२,०८२ पुरुष मतदार, ९८,२२६ महिला मतदार आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.