ZP Election Result – मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. याचा अर्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपल्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी केलेले श्रम यशस्वी झाले आहेत. परंतु मतदान बूथमध्ये जाऊन मतदारांनी कोणते बटन दाबले आणि कोणाच्या गळ्यात विजयमाला घातली आहे, हे सोमवारीच स्पष्ट होईल. दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी विजयाचे दावे केले आहेत. शनिवारी (दि ७) मावळातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३ उमेदवार तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून झालेल्या मतदानाच्या जोरावर संभाव्य निकालाची गणितेही मांडली आहेत. धाकधूक असली तरी विजयाचे मोठ-मोठे दावे मात्र केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच गटामधील इंदोरी- वराळे गट, खडकाळा- कार्ला गट व कुसगाव- काले गट या गटांमध्ये जोरदार रणधुमाळी होती या गटांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत या गटांमधून कोण- कोणते उमेदवार विजयी होतील, याची उत्सुकता लागली आहे. तर विजयाबाबत काही गावांमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विजयाचे दावे केले जात असून या विजयांवर मोठमोठ्या पैजा लागलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी तर भारतीय जनता पक्षाकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. जिल्हा परिषद पुणे राष्ट्रवादीला मोठा विश्वास अजित पवारांच्या निधनाने निवडणुकीला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिल्यांदाच मावळात खूपच शांततेच प्रचार झाल्याचे पहायला मिळाले. शांततेत प्रचार होऊनही भरघोस मतदान झाल्याने जनादेशाकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून आम्हाला मत द्या, अशी मागणीही केली होती. नागरिकांनी आपली मागणी मान्य केली असे गृहित धरुर राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी आमदार जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या १० अशा सर्व जागांवर विजयाचा दावा ठोकत आहेत. मतदानापूर्वीपर्यंत श्रद्धांजली म्हणणारे नेते मतदान झाल्यानंतर विकासावर जनतेने मत दिल्याचे सांगत आहेत. भाजपचा विकासाचा दावा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मावळ तालुक्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. दुसरीकडे राष्ट्रवादीने आता अजितदादांना श्रद्धांजलीच्या नावाने मत मागितली असतानाही भाजपच्या नेत्यांना बहुमताची अपेक्षा आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार यांच्या कर्तुत्वामुळे मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. जिल्हा परिषदेच्या ३ व पंचायत समितीच्या ६ जागांवर भाजपचा विजय होईल, असा दावा भेगडे यांनी केला आहे.