प्रभात वृत्तसेवा कामशेत – मावळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहेत. तालुक्यातील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून गावोगावी बैठका, मतदार संपर्क दौरे आणि राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात इच्छुक उमेदवारांकडून तयारीला जोर देण्यात येत आहे. मतदार यादी तपासणी, नाव नोंदणीतील त्रुटी शोधणे, नवमतदारांपर्यंत पोहोचणे, बूथनिहाय कार्यकर्त्यांची यादी तयार करणे, तसेच प्रचाराची प्राथमिक रूपरेषा आखण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या साखळी बैठकांचे आयोजन करण्यात येत असून स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि मतदारांचा कल यावर चर्चा केली जात आहे. काही गट आणि गणांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढल्याचे चित्र असून इच्छुकांमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा, गटबाजी आणि दबाव तंत्र उघडपणे दिसून येत आहे. वरिष्ठ नेत्यांचे दौरे, पक्ष कार्यालयांतील हालचाली आणि बंद खोलीतील चर्चा यामुळे राजकीय वातावरण अधिकच रंगू लागले आहे. मात्र अद्याप अनेक गट व गणांमध्ये अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता असून राजकीय गणिते सतत बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी, भाजप मात्र संयमी भुमिकेत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसून येत आहे. आजी-माजी पदाधिकारी, माजी सदस्य, स्थानिक नेते तसेच नव्या चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा, बैठकांचे सत्र आणि शक्तिप्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादीत अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने तुलनेने संयमी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. जरी उघडपणे इच्छुकांची संख्या कमी भासत असली तरी प्रत्यक्षात अनेक इच्छुक तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपकडून उमेदवारांची सामाजिक पकड, संघटनात्मक ताकद, मतदारांमधील विश्वासार्हता आणि विजयाची क्षमता याची काटेकोर चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. योग्य उमेदवार निवडून नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारात उतरण्याची रणनीती भाजप आखत असल्याचे संकेत मिळत आहेत.